राज्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा इशारा देण्यात आला आहे. कोकणात हवामान दमट राहील, असेही सांगण्यात आले आहे. पुणे व परिसराच्या भागामध्ये पुढील चार दिवस दिवसा उकाडा, सायंकाळी ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात आजही अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. राज्यात चारही उपविभागांमध्ये पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल.
या जिल्ह्यात गारपीट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नांदेड जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यासह इतरत्र यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज कोकण गोव्यामध्ये हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे.
पुण्यात सायंकाळी पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज पुणे व आजूबाजूच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहील. मात्र, दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी काही भागात गारपीट देखील होऊ शकते.
या जिल्ह्यात पाऊस
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शनिवारी (दि.१८) कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी पाऊस होईल.