ठाणे : उमेदवारी कुणाला द्यायची याबाबत मिंधे गँगला अद्याप गुजरातमधून आदेश आला नाही. भाजप गद्दारांना उमेदवारी देईल की नाही, अशी शंका आहे. गद्दारांचे हाल बघा काय झाले आहेत आणि भाजपने त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली आहे, असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात लगावला.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारेे यांनी सोमवारी सकाळी ठाणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज भरण्यापुर्वी महाविकास आघाडीच्या वतीने मिरवणुक काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या मिरवणुकीत आदित्य ठाकरे हे सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर टिका केली. मिंधेना गँगला अजून गुजरातमधून आदेश आलेला नाही की तिकीट कोणाला द्यायचे. तसेच त्यांना तिकीट मिळेल की नाही हि शंका आहे, अशी टिका करत आमच्याकडची गर्दी प्रेमाची आहे आणि प्रेमाच्या नात्याची असल्याचे त्यांनी म्हटले आहे.भाजप महाराष्ट्र आणि देश संपवायला निघाली आहे. परंतु आम्ही तसे होऊ देणार नाही. आम्ही आमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच दिल्ली पुढे आम्ही झुकणार नाही, असेही ते म्हणाले.
महाविकास आणि इंडीया आघाडी देशभरात अग्रेसर असून आम्ही सर्वजण संविधानासाठी एकत्र आलो आहोत. ज्या लोकांनी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला. आता हेच सगळे लोक महाराष्ट्र तोडू पाहत आहेत आणि हेच बाहेरचे लोक आम्हाला शिकवत आहे की शिवसेना काय आहे. पण, जनता त्यांना दाखवेल शिवसेना काय आहे. ४ जूनला ठाण्यात विजयाची मिरवणुक निघेल, असेही ते म्हणाले.