मुंबई: प्रकाश आंबेडकर यांनी बारामतीत सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला. नागपूरमध्ये त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. आंबेडकर यांच्याबद्दल काही बोलणार नाही. आमच्या दोघांच्या आजोबांचे ऋणानुबंध होते. आपण हुकूमशाहीविरुद्ध एकत्र आलो होतो. आज आपले जमले नसेल पण भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नका. काही वेळा काही गोष्टी होत नाहीत, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. त्यात तथ्य नव्हते. आम्ही त्यांना प्रत्युत्तर दिले असते. पण आम्ही त्यांच्याविरोधात बोललो नाही. बोलणार नाही. त्यांनी माझ्यावर कितीही टीका केली तरी त्यांच्याविरोधात बोलणार नाही. कारण आमच्या दोघांचे आजोबा समाजसुधारणेसाठी एकत्र आले होते.
ठाकरे पुढे म्हणाले, संविधान धोक्यात असताना एकत्र येऊन ताकद दाखवायला हवी होती.
हरकत नाही. माझ्या लोकांना सांगितले आहे की त्यांच्याविरोधात बोलू नका. उद्धव ठाकरे म्हणाले, शिंदे गटातील कुणालाही शिवसेनेत घेणार नाही. राजू शेट्टी हे मशाल चिन्हावर लढण्यास तयार नव्हते म्हणून आम्ही हातकणंगलेमधून उमेदवार दिला आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.