राज्य: विधानसभा निवडणुकीत महायुतीला एतिहासिक यश मिळाले. त्यानंतर दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपला गेल्यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच, मुंबईतील महत्वाच्या बैठका सोडून शिंदे अचानक गावी गेल्यामुळे या चर्चाना अधिक बळ मिळालं. मात्र, आता या सर्व चर्चावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले असून, भाजपच्या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार शिंदेंनी केला आहे.
“मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या होत्या. आम्हाला जनतेने यश प्रचंड मिळवून दिले. मी मागच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका स्पष्ट केली होती. नरेंद्र मोदी आणि अमित शहा मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील, त्याला माझा आणि शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल. आमच्या मनात किंतू-परंतू नाही आणि इतर कुणाच्याही मनात नसावा”,अशी स्पष्टोक्ती शिंदें यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
ते पुढे म्हणाले, ” आमची एक बैठक अमित शहांसोबत झाली होती, आता आमची तिघांची बैठक होईल आणि यातून महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. राज्याने आम्हाला खूप दिले आहे, राज्यात लवकर चांगले सरकार स्थापन व्हावे, अशी जनतेची इच्छा आहे. लोक काय बोलतात, विरोधक काय बोलतात, ह्याच्याशी आम्हाला घेणं-देणं नाही.
महायुतीत कुठलाही समन्वयाचा अभाव नाही. मला माझी भूमिका परत परत मांडण्याची गरज नाही. मी यापूर्वीच सांगितले की, भाजप जो निर्णय घेईल, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल”, असे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.