इंदापूर: अजित पवार यांच्यावर नाराज असलेले इंदापूरमधील भाजपाचे नेते, कार्यकर्ते यांची समजूत काढण्यासाठी आज बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचे आश्वासन दिले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, चीन आणि पाकिस्तानला वाकडी नजर करून पाहता येणार नाही. हा मोदींचा सन्मान नाही. हा भारताचा सन्मान आहे. आपल्याला मोठ्या ध्येयासाठी काम करायचे आहे. झाले ते विसरून महायुतीसाठी काम करायचे आहे. मोदींसोबत बारामतीचा खासदार पाहायचा आहे. तुमचे म्हणणे समजून घेतले आहे, आणि कृतीतून करून दाखवणार हा विश्वास देण्यासाठी आज आलो आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, २०१९ मध्ये छोटासा अपघात झाला. त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला. पूर्ण बहुमत मिळाल्यानंतरही काही लोक मतांच्या विरोधात गेले. निव्वळ खुर्चीसाठी आमचे २५ वर्षांचे मित्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत गेले. म्हणून एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीत राहायचे नाही असे ठरवले. त्यावेळी राष्ट्रवादीत देखील खदखद सुरू होती. म्हणून अजित पवारांनी विकासासाठी मोदींसोबत गेले पाहिजे असा विचार केला. जे लोक सोबत यायला तयार होते त्यांना सोबत घेतले पाहिजे.
काही ठिकाणी आपला संघर्ष हा राष्ट्रवादीसोबत होता. मोदी साहेबांसाठी हा निर्णय घ्यावा लागणार आहे. मी निर्णय घेतल्यानंतर तीन-चार लोकांशी बोललो. त्यामध्ये हर्षवर्धन पाटील होते. नेत्यांना युती करणे सोपे असते. मात्र कार्यकत्र्यांना युती करणे अवघड असते. मी तुम्हाला आज विश्वास देण्यासाठी आलो आहे. हर्षवर्धन पाटलांसह मी इंदापूर तालुक्याचे पालककत्व स्वीकारण्यासाठी आलो आहे, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले..
देवेंद्र फडणवीस म्हणाले, काही लोकांना वाटते की, बारामतीची लढाई शरद पवार आणि अजित पवार यांच्यात आहे. काहींना वाटते की ही लढाई सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात आहे. ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे. मोदींच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करणाऱ्या सुप्रिया सुळे होत्या. कलम ३७० ला विरोध सुप्रिया सुळे यांचा होता.