इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर हल्ला झाल्यांनतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या. या प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गृहमंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी केली.
पालकमंत्री अजित पवार यांनी काल माध्यमांशी बोलताना आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा होईल अशी प्रतिक्रिया दिली. राज्यात अधिकारीही सुरक्षित नसल्याचे म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच घेरल्याचे दिसत आहे. समाजात पोलिसांची भीती उरली नसल्याचेही आरोप केले जात आहेत. हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी हल्ला करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या सात तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे.
इंदापूरचे तहसीलदार तहसील कार्यालयाच्या जवळ संविधान चौकात आले तेव्हा एका चारचाकी गाडीतून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने श्रीकांत पाटील यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. त्यानंतर एका आरोपीने श्रीकांत पाटील यांच्या गाडीच्या ड्रायव्हरच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने गाडीवर जोरदार हल्ला केला. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.
बारामतीचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काल (दि २५) सकाळी इंदापूर शहरातील संविधान चौकात अज्ञातांनी हल्ला केला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनेनंतर सात तासात पोलिसांनी तीन हल्लेखोरांना ताब्यात घेतलं आहे. तसेच इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली.
तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी यापूर्वी केलेल्या गौण खनिजाच्या कारवाईतून मनात राग धरून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मागच्या काळात पोलीस ठाण्यात झालेला गोळीबार , पुणे कल्याणीगर भागातील अपघात , आणि आता इंदापूर तहसीलदार यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला अशा अनेक घटना घडत असल्याने राज्यात सुरक्षिततेचा मोठा प्रश्न उपस्थित झाल्याचे बोलले जात आहे.