राज्यात ज्या पद्धतीने विरोधी पक्ष उभा राहिला पाहिजे, तो राहत नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधी आघाडी उभी राहावी, हे आमचे मत होते. पण, आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला असे नमूद करतानाच वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आता आम्ही इतरांना सोबत घेऊन नवी आघाडी करण्याचा निर्धार व्यक्त केला. आंबेडकर म्हणाले,” शिवसेना आणि काँग्रेस यांचे सूत जुळलेले नाही, हे मी आधीपासून सांगत होतो, ते आता उघड होऊ लागले आहे. कुणाला बाजुला टाकू नये, सर्वांना सोबत घेऊन काम करावे, असे आमचे म्हणणे आहे.”
पहिल्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याची मुदत संपत होती. त्यामुळे आमच्या पक्षाने पहिल्या टप्प्याचे उमेदवार जाहीर केले. एका जागेवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला, असे सांगून आंबेडकर यांनी नमूद केले की भाजपला मोकळे रान देऊ इच्छित नव्हतो, म्हणून आम्ही उमेदवार दिले. ही लढाई वंचित विरूद्ध भाजप, अशी असेल. मराठा समाज गावागावातून उमेदवार देणार होते. आता प्रत्येक मतदारसंघातून एकच उमेदवार देण्याचे ठरत आहे. जरांगे-पाटील यांच्याकडून उद्यापर्यंत माहिती येऊ शकते, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
शिवसेना नेते संजय राऊत महाविकास आघाडीच्या नावाने चुकीची माहिती देत आहेत, ते आघाडीत बिघाडी करण्याचे काम करत आहेत,असा आरोप करून आंबेडकर म्हणाले की आमच्याकडे तीन जागांचा प्रस्ताव आला होता.