उदयनराजेंना महायुतीने डावललं तर तुम्ही तिकीट देणार का? शरद पवारांनी कॉलर उडवत दिलं उत्तर…
राज्यसभेचे खासदार आणि भाजपा नेते उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. मात्र भाजपाने अद्याप त्यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केलेले नाही. तिकीट मिळावे यासाठी उदयनराजे गेल्या आठवड्यात दिल्लीत ठाण मांडून बसले होते. तीन दिवस ताटकळल्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी त्यांना भेट दिली होती. त्यानंतर उदयनराजे साताऱ्यात परतल्यानंतर त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. मात्र अद्याप त्यांना तिकीट जाहीर झालेले नाही. यावर शरद पवार यांना आज प्रश्न विचारण्यात आला. सातारा येथे दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली, यामध्ये त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
उदयनराजेंचं नाव घेताच उडवली कॉलर
उदयनराजे यांना अद्याप महायुतीने उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांनी जर तुमच्याशी संपर्क साधल्यास त्यांच्याशी बोलणार का? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी आता तशी शक्यता नसल्याचे स्पष्ट सांगितले. तसेच पत्रकार म्हणाले की, मग तुम्हीही कॉलर उडविणार का? त्यावर शरद पवारांनी पत्रकार परिषदेतच आपली कॉलर उडवून दाखविली. त्यामुळे पत्रकारांमध्येही हशा पिकला.
उदयनराजे आता भाजपामध्ये आहेत. मी पाहिले दोन दिवसांपूर्वी सातार शहराने त्यांचे संपूर्ण रस्त्यात स्वागत केले. त्यामुळे त्यांनी आमच्याशी संपर्क साधण्याचा विषयच येत नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. २०१९ साली उदयनराजेंनी शरद पवारांशी बंडखोरी करून पोटनिवडणुकीला सामोरे गेल्यानंतर शरद पवार यांनी सातारकरांना चूक सुधारण्याचे आवाहन केले होते. यावेळीदेखील चूक करू नका, असे आवाहन करणार का? असा प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, सातारकर चाणाक्ष आहेत. त्यांना आवाहन करण्याची कोणतीही आवश्यकता नाही.
प्रफुल पटेलांवर केली खोचक टीका
प्रफुल पटेल यांच्याविरोधात २०१७ मध्ये नोंदविण्यात आलेला भ्रष्टाचाराचा खटला केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बंद केल्याची माहिती समोर आली. अजित पवार गटाने भाजपाला पाठिंबा देताच प्रफुल पटेल यांना क्लीन चीट मिळाली असल्याचे बोलले जात आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली असताना त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की, ही चांगली बाब आहे. प्रफुल पटेल आमच्याकडे असताना आम्ही सर्वच चिंतेत असायचो. पण आता तुरुंगात जाण्यापेक्षा, भाजपामध्ये गेलेलं बरं, असं जे म्हटले जाते. ते खरे ठरताना दिसत आहे.