पुणे: उधारीवर सिगारेट न दिल्याने टपरी चालकावर धारधार शस्राने वार करुन परिसरात दहशत पसरविण्याचा प्रकार जुना मुंढवा रोडवर घडला. ही घटना रविवारी (दि.७) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत राजेश ब्रिजलाल जैस्वाल (वय-३५ रा. झेड कॉर्नर मांजरी, पुणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन शाहीद कलीम शेख, राजु मच्छिंद्र शिंदे (दोघे रा. आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांच्यावर आयपीसी ३२६, ५०४, ५०६, ४२७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शाहीद शेख हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर स्वारगेट, वानवडी, चंदननगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश जैस्वाल यांचे जुना मुंढवा रोडवरील रिलॅक्स हॉटेल जवळ पूजा पान शॉप आहे. रविवारी सायंकाळी संशयित आरोपी दारु पिऊन त्याठिकाणी आले. आरोपी सतत पान टपरीवर येवून उधारीवर सिगारेट मागतात. रविवारी देखील त्यांनी उधारीवर सिगारेट मागितली. मात्र, जैस्वाल यांनी पुर्वीची उधारी दिली तरच सिगारेट मिळेल असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी जैस्वाल यांना शिवीगाळ केली. तुला आता दाखवतो असे म्हणून आरोपीने धारदार हत्याराने जैस्वाल यांच्या हातावर वार केला. तसेच दगड फेकून मारला. आरोपींनी पान टपरीची तोडफोड करुन नुकसान केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.