पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड शहरात ठीक-ठिकाणी विकास कामे सुरू आहेत. त्यातलाच एक भाग म्हणून किवळे गावचा मुख्य चौक (कृष्णा वेज) येथून ते किवळे गावठाण या ठिकाणी एम.एन.जी.एल ची भूमिगत पाइप लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र हे काम करत असताना संबंधित ठेकेदार उकरलेली माती व्यवस्थितरित्या पुन्हा टाकत नाही. त्याचप्रमाणे उर्वरित मातीचा त्याच ठिकाणी ढिगारा लावत आहे. ती माती रस्त्यावर पसरून अनेक वाहन चालक गाडी घसरून पडत असल्याच्या तक्रारी आहेत. खड्डे खंदताना त्या खड्ड्यालगत कोणत्याही प्रकारे रिफ्लेक्टर, बॅरिकेट किंवा खबरदारी दर्शवणारा फलक लावत नाही. ज्यामुळे त्या खड्ड्यात एखादा नागरिक किंवा लहान मुले पडून गंभीर दुखापत होऊ शकते.
सदर बाबतची तक्रार काही सुजाण नागरिक करत असल्यामुळे सदरची बातमी करण्यासाठी पत्रकार त्याठिकाणी गेले असता तेथील कामगार फारुक खान याने पत्रकार सोबत गैरवर्तन करत त्यांना ‘तुला काय करायचे आहे ते कर मला काही फरक पडत नाही, मी तुला बघुन घेईन” असे म्हणत काही राजकीय नेत्यांची नावे सांगितली. पत्रकाराने त्वरित सदर बाबतची माहिती डायल ११२ ला कळवली असता रावेत पोलीस घटनस्थळी दाखल झाले. मात्र, त्याठिकाणी फारुक खान याने फोन करून बोलावलेल्या राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता संबंधित पत्रकाराला ‘पोलीस स्टेशनला जा आणि काय तक्रार आहे ती करा’ असे सांगितले.
पत्रकाराने रावेत पोलीस स्टेशनला त्याबाबत एन.सी. नोंदवली आहे. त्यांच्या तक्रारी प्रमाणे एम.एन.जी.एल चा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने काम करणाऱ्या कामगाराविरोधात भा.दं.वि. कलम ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ मानला जातो, पत्रकारासोबत घडलेला हा प्रकार अनुचित आहे. संबंधित ठेकेदार पोलीस व या कामाशी निगडित इतर यांसह फारुक खान याच्या विरोधात पोलीस प्रशासन काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.