औंध जिल्हा रुग्णालयात चक्क रक्त गटाची अदलाबदल; रुग्णची परिस्थिती चिंताजनक, रुग्ण आयसीयूमध्ये दाखल
पुणे शहरातील औंध परिसरातील आसलेल्या औंध जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. २३) रोजी उपचारासाठी दाखल असलेल्या शेजारी-शेजारी असलेल्या दाेन रुग्णांना द्यायच्या रक्त गटाचीच अदलाबदली केल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. परिचारिकेचा निष्काळजीपणा रुग्णांच्या जिवावर बेतणारा असून, या दाेन्ही रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
औंध येथील इंदिरा वसाहतीत राहणारे दत्तू सोनाजी सोनवणे यांना गुरुवारी (दि. २१) दुपारी औंध जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना न्यूमाेनिया झाल्याने श्वास घेण्यास अडचण येत होती. त्यांचे हात-पाय सुजलेले आणि पोट फुगलेले होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना दोन-तीन दिवस ॲडमिट करण्याचा सल्ला दिला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शनिवारी (दि. २३) जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची रक्त तपासणी केली आणि सोनवणे यांना रक्त चढवण्याची सूचना केली. शेजारीच असलेल्या दगडू कांबळे या रुग्णालाही रक्त चढवायचे हाेते.
साेनवणे यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह, तर कांबळे यांचा रक्तगट बी पॉझिटिव्ह हाेता. त्यांच्या नावाने रक्ताच्या पिशव्यादेखील आल्या. मात्र, संबंधित ड्युटीवरील परिचारिकेने निष्काळजीपणा करत सोनवणे यांची पिशवी कांबळे यांना, तर कांबळे यांची पिशवी साेनावणे यांना चढवली. विरुद्ध रक्त चढवल्याने त्यांना त्याचा रिॲक्शन झाल्यानंतर आणि नातेवाइकांनी तक्रार केल्यावर त्या रक्तपिशव्या तपासण्यात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला, तत्काळ रुग्ण कांबळे व साेनावणे यांना उपचारासाठी अतिदक्षता कक्षात हलवण्यात आले. आता दाेघांची प्रकृती स्थिर आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागनाथ यमपल्ले यांनी सांगितले. मात्र आरोग्य कर्मचाऱ्याचा अशा प्रकारचा निष्काळजीपणा कितपत योग्य आहे त्याच प्रमाणे या घटने नंतर प्रशाशन कठोर कारवाई करणार कि नाही असा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे.