राष्ट्रीय काँग्रेसने आपला लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. ग्यान संकल्पनेवर आधारित या जाहीरनाम्यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. काँग्रेसने जाहीरनाम्यात पाच न्याय आणि २५ गॅरंटी दिल्या आहेत. युवा, रोजगार, मजूर, महिलांना १ लाखांची मदत, शिक्षण, शेतकऱ्यांना एमएसपीची हमी यासह ३० लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.
जी(G)- गरीब, वाय(Y)- युवा, ए (A)- अन्नदाता, एन (N)- नारी, अशा ग्यान संकल्पनेवर हा जाहीरनामा अधारीत आहे. जाहीरनाम्यात काँग्रेसने तीस लाख युवकांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच आरक्षणाची मर्यादा वाढवविण्याचे, तसेच सरकारी नोकऱ्यांमधील कत्रांटी धोरण रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यानुसार, विद्याथ्र्यांचा छळ होऊ नये, म्हणून कायदा केला जाणार. गरीब महिलांना वर्षाला १ लाख रुपये दिले जातील. शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाच्या धर्तीवर एमएसपी दिली जाईल. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास एका महिन्यात मदत मिळेल. तसेच शेतकऱ्यांच्या गरजेच्या सर्व गोष्टींवरील जीएसटी हटविण्यात येईल. असंघटित कामगारांसाठी दुर्घटना वीमा योजना आणली जाईल. बेरोजगार भत्त्यासारख्या योजनांमध्ये पैसे थेट खात्यात पाठवले जातील.
तसेच मोदी सरकारची वादग्रस्त अग्निवीर योजना बंद करून जुन्या पद्धतीने भरती राबविली जाईल. पेपरफुटीचे प्रकार थांबविण्यासाठी योग्य निर्णय घेण्यात येईल. गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली जाईल. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केली जातील, इत्यादी आश्वासने काँग्रेसने दिली आहेत.