पुणे: आज (दि.३) रोजी सकाळी ७ वाजता कोंढवा खुर्द येथील अग्निशमन दल नियंत्रण कक्षात कुमार प्रगती सोसायटी, कौसरबाग, कोंढवा खुर्द याठिकाणी एका इमारतीत चौथ्या मजल्यावर इसम अडकला असल्याची वर्दि मिळताच अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले.
घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता अग्निशमन जवानांना समजले की, एक इसम विंग डी या इमारतीत चौथ्या मजल्यावर बाहेरील सज्जावर बऱ्याच वेळेपासून अडकला आहे. जवानांनी तातडीने अग्निशमन वाहनावरील शिडी सदर इमारतीच्या भिंतीला लावून जवळपास पस्तीस फुट उंचावर जात त्या इसमाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत सेफ्टी बेल्ट, रश्शी याच्या साह्याने त्या इसमाला सुखरुप खाली घेत सुमारे वीस मिनिटात कार्यवाही पुर्ण केली. सदर इसम (वय ३१) हा त्या इमारतीमधील रहिवाशी नसून मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी अग्निशमन दलाला दिली. तसेच पुढील तपास संबंधित विभागाचे पोलिस अधिकारी करीत आहेत.
या कामगिरीत प्रभारी अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे व वाहनचालक सत्यम चौंखडे तसेच तांडेल महादेव मांगडे व जवान सागर दळवी, निलेश वानखडे, कुणाल खाडे, मनोज भारती यांनी सहभाग घेतला.