पुणे: कोरेगाव पार्क परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या कारवाईत थायलंडच्या चार तरुणींसह सहा मुलींची सुटका करण्यात आली असून स्पा मालक व मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैद्यरित्या मुलींना स्पा च्या नावाखाली जास्त पैशाचे अमिषा दाखवून वेश्या व्यवसाय करुन घेत होते.
मॅनेजर शाहरुख अहमद चौधरी (वय २७, रा. जाधवनगर, मुंढवा मुळ रा. जुनिजान ता. जि. हुजाई, आसाम) आणि स्पा मालक सुरेंद्र जगन्नाथ पाटील (वय ३२, रा. सुखवानी रॉयल सोसायटी, विमाननगर) यांच्यावर आयपीसी ३७०, ३४ सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार रेश्मा सुरेश कंक यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. ही कारवाई मंगळवारी (दि.२) सायंकाळी साडे सहा वाजता केली.
कोरेगाव पार्क परिसरातील ज्वेल स्क्वेअर या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या स्पा सेंटर येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना समजली. त्यानुसार पोलीस पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर स्पा सेंटर येथे छापा टाकून सहा तरुणींना ताब्यात घेतले. यामध्ये चार थायलंड आणि दोन आसाम मधील तरुणीचा समावेश आहे.
आरोपी स्पा सेंटरमध्ये पीडित मुलींकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होते.
वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात समोर आले. या कारवाईत पोलिसांनी ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करीत आहेत.