पुणे, दि. २२: गणेशखिंड रस्त्यावर पुणे विद्यापीठ चौकामध्ये उड्डाणपूल व मेट्रो बांधकाम काम सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचा रस्ता अरुंद झालेला असल्यामुळे गणेशखिंड रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी यापूर्वी असलेले वाहतूकीचे सर्व आदेश रद्द करून गणेशखिंड रोड रस्त्यावरील वाहतुकीच्या बदलाबाबत पुणे शहर पोलीस उपआयुक्त (वाहतूक) यांनी प्रायोगित तत्वावर तात्पुरते आदेश जारी केले आहेत.
पुणे विद्यापीठ चौकामधुन गणेशखिंड रस्त्याने सेनापती बापट रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सेनापती बापट रोड जंक्शन येथून उजवीकडे प्रवेश बंद राहणार असून वाहनचालकांनी कॉसमॉस बँकेसमोरून यु-टर्न घेवून सेनापती बापट रोड जंक्शन वरून डावीकडे वळण घेवून पर्यायी मार्गाने जावे.
शिवाजीनगरकडून गणेशखिंड रस्त्यावर येणाऱ्या रेंज हिल्सकडे जाणाऱ्या वाहनांसाठी रेंज हिल्स् कॉर्नर येथे उजवीकडे प्रवेश बंद राहील. वाहनचालकांनी कॉसमॉस बँकेसमोरून यु-टर्न घेवून रेंज हिल्स् कॉर्नर येथून डावीकडे वळण घेवून रेंज हिल्सकडे पर्यायी मार्गाने जावे.
पुणे विद्यापीठ चौकातून औंध, सांगवी, डांगे चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना औंध रोडवरून प्रवेश बंद राहील. वाहनचालकांनी पुणे विद्यापीठ चौकामधून बाणेर रस्त्याने जावे व राजभवनच्या पाठीमागील बाजुस यु-टर्न घेवून पुणे विद्यापीठ चौकामध्ये यावे व डावीकडे वळण घेवून औंध रोडने जावे.
पुणे विद्यापीठ चौकातून बाणेरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बाणेर रोडवरून प्रवेश बंद राहणार असून वाहनचांलकांनी पुणे विद्यापीठ चौकातून डावीकडे वळणे घेवून पाषाण रोडने अभिमानश्री जंक्शन येथून उजवीकडे वळण घेवून बाणेर रस्त्याला येवून बाणेरकडे जावे. बाणेर व औंध रस्त्यावरून पुणे विद्यापीठ चौकामध्ये येणाऱ्या वाहतुकीमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
जड, अवजड वाहने, ट्रक, ट्रेलर्स, कंटेनर्स यांच्यासाठी २४ तास प्रवेश बंद
गणेशखिंड रस्त्यावरील चाफेकर चौक ते पुणे विद्यापीठ चौक, औंध रस्त्यावरील ब्रेमेन चौक ते पुणे विद्यापीठ चौक, बाणेर रस्त्यावरील अभिमानश्री चौक ते पुणे विद्यापीठ चौक, पाषाण रस्त्यावरील अभिमानश्री चौक ते पुणे विद्यापीठ चौक व सेनापती बापट रस्त्यावरील जे. डब्ल्यू. मेरीएट हॉटेल चौक ते पुणे विद्यापीठ चौजक या मार्गावर सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहने, ट्रक, ट्रेलर्स व कंटेनर्स यांना २४ तास प्रवेश बंदी राहील.
भाजीपाला वाहतूक करणारे तीनचाकी पिकअप, तीनचाकी, चारचाकी मालवाहतूक करणारी सर्व प्रकारची वाहने तसेच डंपर, मिक्सर, जे.सी.बी., रोड रोलर कमी वेगाने चालणारी वाहने व इतर वाहनांना सकाळी ८ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री १० वाजेदरम्यान वा. दरम्यान प्रवेश बंद राहील, असेही पोलीस उपआयुक्त (वाहतूक) रोहिदास पवार यांनी कळविले आहे.