वानवडी परिसरात घरफोडी करुन दागिने व रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला वानवडी पोलिसांनी अटक केली आहेत. आरोपीकडून वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून ६ लाख ७९ हजार २५० रुपये किंमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. रेयान उर्फ फहिम फैयाज शेख (वय-२१ रा. निहाल हाईट्स, सना बेकरी, भाग्योदय नगर, कोंढवा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वानवडी परिसरात ११ फेब्रुवारी रोजी घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण २ लाख ३३ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याबाबत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने सीसीटीव्ही व सीडीआरचे तांत्रिक विश्लेषण व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करण्यासाठी दोन तपास पथके तयार करण्यात आली होती.
तपासा दरम्यान सीसीटीव्ही मध्ये दिसणारा संशयित हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रेयान शेख असल्याची माहिती मिळाली. आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने वानवडी परिसरात तीन ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यातील सहा लाख ७९ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ -५ आर राजा, सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे पोलीस अंमलदार हरिदास कदम, अमजद पठाण, विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, संदिप साळवे, विष्णु सुतार, यतिन भोसले, अमोल गायकवाड, गोपाल मदने यांच्या पथकाने केली.