पुणे: चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर कोयता आणि चाकूने वार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी पतीस न्यायालयाने १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावास भाेगावा लागेल, असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. भालचंद्र गिराप्पा सुर्वे (वय ३७, रा. आचेगाव, ता. दक्षिण सोलापूर) असे शिक्षा सुनावलेल्या पतीचे नाव आहे. आराेपी भालचंद्रने पत्नी अर्चनाचा २८ जुलै २०१९ रोजी सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची येथील राहत्या घरात खून केला होता. याबाबत अर्चनाचे वडील दत्ता बाबूराव बागडे (वय ५४, रा. ऊरळी देवाची) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अर्चनाचा भालचंद्रशी २००८ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांना दोन मुले झाली. दोघांमध्ये भांडणे होत असल्याने अर्चना दोन मुलांसह जानेवारी २०१८ मध्ये माहेरी निघून आली होती.
ती एका कंपनीत सफाई कर्मचारी म्हणून काम करायची. २८ जुलै २०१९ रोजी अर्चनाचे आई-वडील दोन मुलांना घेऊन चर्चमध्ये गेले होते. त्यावेळी घरात कोणी नव्हते. भालचंद्र घरी गेला. तू माझ्याबरोबर नांदत का नाही ? अशी विचारणा करुन त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. त्याने अर्चनावर चाकू आणि कोयत्याने ३७ वार केले आणि तो पसार झाला. पसार झालेल्या भालचंद्रला पोलिसांनी अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून अतिरिक्त सरकारी वकील ॲड. राजेश कावेडिया यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून १२ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. अर्चनाचा भाऊ आणि शेजाऱ्याची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्याला कठोर शिक्षा देण्याची विनंती सरकारी वकील ॲड. कावेडिया यांनी युक्तिवादात केली. न्यायालायने साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य घरून आरोैपी भालचंद्रला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, हवालदार ललिता कानवडे, शिपाई माणिक गळकाटे यांनी न्यायालयीन कामकाजात सहाय केले.