पुणे: धावत्या पीएमपी बसमध्ये तसेच सार्वजनिक उत्सव दरम्यान गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरणार्या टोळीला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. विकी कृष्णा माने (वय १९), राज कृष्णा माने (वय २३), कृष्णा रमेश माने (वय ४४, तिघे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) सुधीर नागनाथ जाधव (वय ४६, रा. शास्त्रीनगर, मुंढवा) आणि संतोष शरण्णाप्पा जाधव (वय ४०, रा. मांजरी बुद्रुक) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पीएमपी बसमध्ये तसेच गणेशोत्सवात अनेक नागरिकांच्या सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. सादर गुन्हयांचा तपास करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी पोलिसांना दिल्या होत्या. फरासखाना पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार गजानन सोनुने व प्रविण पासलकर यांना ८ ऑक्टोंबर रोजी सूर्या हॉस्पिटलसमोरील पीएमपी बसस्थानकावर काही चोरटे थांबले
आहे, अशी बातमी त्यांच्या गोपनीय बातमीदारांमार्फत मिळाली. या बातमीवरुन पोलिसांनी सादर ठिकाणी जाऊन पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत फरासखाना पोलीस ठाण्यातील तीन आणि येरवडा पोलीस ठाण्यातील एक असे ४ गुन्हे उघडकीस आले.
त्यामधील १०२.६२० ग्रॅम सोन्याचे दागिने, सोन्याचे दागिने कटींग करण्यासाठी वापरलेले लोखंडी कटर असा सर्व मिळून ७ लाख ३४ हजार ६४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे निरीक्षक अजित जाधव, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, सहायक फौजदार मेहबुब मोकाशी, पोलीस अंमलदार गजानन सोनुने, नितीन तेलंगे, महेश राठोड, संदिप कांबळे, प्रविण पासलकर, नितीन जाधव, तानाजी नागंरे, वैभव स्वामी, विशाल शिंदे, अर्जुन कुडाळकर, समीर माळवदकर, वसिम शेख, सुमित खुट्टे, महेश पवार, शशिकांत ननावरे व चेतन होळकर यांनी केली आहे.