जुन्नर पिंपळवंडी: काळवाडी(ता.जुन्नर) येथील येथील बेल्हेकर वस्ती शिवारातील मंगल नवनाथ बेल्हेकर या महिलेवर बिबट्याने हल्ला करून त्यांना जखमी केले. सदर घटना रविवारी(ता.३१) संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. मंगल बेल्हेकर यांनी सांगितले की त्या व त्यांचे पती नवनाथ बेल्हेकर हे शेतात काम करत असताना केळीच्या शेतातून येत बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.
‘केळीच्या पानांचा आवाज आल्याने मी त्या दिशेने पाहिले असता एक मोठा बिबट्या माझ्याकडे येताना मला दिसला. त्या बिबट्याने अचानक माझ्यावर हल्ला केला. मी आरडाओरडा केल्याने बाजुलाच असलेले माझे पती नवनाथ बेल्हेकर हे देखील बिबट्याच्या दिशेने पळत आले. मोठ्याने ओरडल्यामुळे बिबट्याने मला सोडले व तो बाजुच्या शेतात पळुन गेला’. या हल्ल्यात मंगल बेल्हेकर यांच्या खुब्याला जखम झाली असुन त्यांना पिंपळवंडी येथे उपचारासाठी नेण्यात आले.
सदर घटनेची माहिती वनविभागाला कळवली असता वनविभागाचे वनपाल एस.के.साळुंखे यांनी सदर घटनेची माहिती घेतली. रविवारी सकाळी देखील काळवाडी येथील एका वृद्धावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती काळवाडीचे अजय बेल्हेकर यांनी दिली. भविष्यात कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणुन वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.