पुणे: दोन महिन्यापूर्वी किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सहा ते सात जणांच्या टोळक्याने तरुणावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.५) रात्री साडे अकराच्या सुमारास रायकरमळा धायरी येथील मोकळ्या मैदानात घडला.
याबाबत विराज अजय चितारे (वय-२२ रा. आरोही कॉम्प्लेक्स, काळुबाई चौक, रायकरमळा, धायरी) याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पप्य लोणारे, महेश रोगे, व इतर पाच ते सहा जणांवर भा.दं.वि. कलम ३२६, ३२३, ५०४, १४३, १४५, १४७, १४८, १४९ सह आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन लोणारे आणि रोगे याला अटक केली असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विराज चितारे याचा मित्र जय दयाडे याचे आरोपींसोबत दोन महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. शुक्रवारी रात्री विराज व त्याचा मित्र मोकळ्या मैदानात कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आरोपी दुचाकीवरुन त्याठिकाणी आले. जुन्या वादातून आरोपींनी विराज याच्या डोक्यात लोखंडी वस्तु मारुन गंभीर जखमी केले.
आरोपी महेश रेघे याने त्याच्याकडील लोखंडी वस्तू विराज याच्या कानाच्या पाठीमागे मारली. यामुळे विराज याला चक्कर आल्याने तो खाली पडला. त्यावेळी पप्या लोणारे व इतर आरोपींनी विराज याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन पळून गेले. विराज याने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोडवलकर करीत आहेत.