जुन्या वादाचा राग मनात धरुन मित्राला चहा पिण्यासाठी बोलावून घेत डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना पुण्यातील पाडंवनगर येथे घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२९) दुपारी साडेतीन ते पावणे चार वाजण्याच्यादरम्यान गोलंदाज चौकाजवळ घडली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत जखमी शंकर बादशहा मिरेकर (वय-४२ रा. जुनी वडारवाडी, पुणे) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन किशोर गोविंद धोत्रे (वय-३६ रा. वैदुवाडी पोलीस चौकी समोर, शंकरमठ, हडपसर) याच्यावर आयपीसी ३०७, ५०४, ३४ आर्म ऍक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शंकर मिरेकर आणि किशोर धोत्रे असे दोघे ही जणं या घटनेत जखमी झाले असून हे सगळं कृत्य पूर्ववैमनस्य आणि एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून घडल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी ऐकमेकांचे मित्र आहेत. त्यांच्यात पूर्वी वाद झाला होता. याचा राग किशोर धोत्रे याच्या मनात होता. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता आरोपीने शंकर याला चहा पिण्यासाठी बोलावुन घेतले. त्यानंतर त्याच्यासोबत वाद घालून टोकदार लोखंडी रॉडने पायाच्या पिंडरीजवळ व मानेवर खुपसुन जखमी केले. त्यानंतर शिवीगाळ करत गाडीच्या डीकीतुन कोयता काढून शंकरच्या डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक केकान करीत आहे.