पुण्यात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तरुणाने झोमॅटो कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम सुरु केले. मात्र, डिलिव्हरी करताना हॉस्टेलमधील मुलांचे लॅपटॉप चोरी करण्यास सुरुवात केली. वारजे माळवाडी पोलिसांनी वसतीगृहातील मुलांचे लॅपटॉप चोरणाऱ्याला अटक करुन ४ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ५ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
तेजस दत्तात्रय सुर्यवंशी (वय-२३ रा. मगनपुरा, नवामोंढा, जि. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलींग करत असताना आरोपी तेजस याला ताब्यात घेतले. तेजस एक वर्षांपूर्वी पुण्यात डि.एम.एल.टी. शिक्षण घेण्यासाठी आला. शिक्षण घेत असताना त्याने झोमॅटो कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयची नोकरी करण्यास सुरुवात केली.
डिलेव्हरीचे काम करताना कोणत्या ठिकाणी मुलांचे हॉस्टेल आहेत, मुले कधी बाहेर जातात, कधी रुमवर परत येतात याची माहिती मिळवली. त्यानंतर त्याने संधी साधून हॉस्टेलवर जाऊन तेथे राहणाऱ्या मुलांचे लॅपटॉप, मोबाईल चोरी करण्यास सुरुवात केली. वारजे माळवाडी पोलिसांनी त्याच्याकडे सखोल तपास करुन ९ लॅपटॉप, ३ मोबाईल, १ दुचाकी असा एकूण ४ लाख ६२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपी तेजस याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन लॅपटॉप, तीन मोबाईल, एक स्मार्टवॉच चोरले आहे. तसेच अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन लॅपटॉप, सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन लॅपटॉप चोरले. तर नांदेड जिल्ह्यातील मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-३ संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त भिमराव टेळे यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगातप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार प्रदीप शेलार, भुजंग इंगळे, विजय भुरुक, बंटी मोरे, मनोज पवार, श्रीकांत भांगरे, संभाजी दराडे, विक्रम खिलारी, शिरीष गावडे, अजय कामठे, शरद पोळ, सत्यजित लोंढे व रियाज शेख यांच्या पथकाने केली.