डोंबिवलीतल्या एमआयडीसी भागात असलेल्या सोनारपाडा या ठिकाणी एका केमिकल कंपनीत मोठ्ठा स्फोट झाला आहे. या स्फोटांमुळे साधारण तीन ते चार किमीचा परिसर हादरल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच आगीचे लोळ आणि धुराचे लोट हवेत दिसून लागले आहेत. याशिवाय या स्फोटामुळे काही जण जखमी झाल्याचीदेखील शक्यता आहे.
दरम्यान, या स्फोटानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेन्द्र आव्हाड यांनी एमआयडीसीवर आरोप केले आहेत. दोन वर्षांपासून एमआयडीसीकडून कोणत्याही कंपनीचे फायर ऑडिट करण्यात आलेले नाही, असे ते म्हणाले. त्यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
एखादी दुर्घटना घडू नये, यासाठी जी काळजी घ्यायची असते ती प्रशासनिक पातळीवर कधीच घेतली जात नाही. महत्त्वाचे म्हणजे फायर ऑडिटसारखी गोष्ट महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याच विभागाद्वारे केली जात नाही. त्यामुळे आग लागल्यावर ज्या उपाय योजना कराव्या लागतात, त्या योग्य वेळत होते नाही. त्यामुळे आग वाढते आणि अनेकांचा मृत्यू होतो. माध्यमं दोन दिवस बातमी चालवतात. नंतर सगळं विसरून जातात. मृत्यू झालेल्यांना काही आर्थिक मदत दिली जाते. मात्र, त्यानंतर त्या घटनेची कोणतीही चर्चा होत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
पुढे बोलताना त्यांनी गेल्या दोन वर्षात एमआयडीसीकडून कोणत्याही कंपनीचे फायर ऑडिट करण्यात आले याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणीही केली. डोबिंवलीत दोन वर्षांपूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली होती. त्यावेळी घराघरात आग पोहोचली होती. त्यानंतर आजपर्यंत अशा घटना घडू नये, यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. तेव्हापासून आजपर्यंत एमआयडीसीने किती कंपन्यांचे फायर ऑडिट केले याची महिती देणारे श्वेतपत्र काढावे, असे ते म्हणाले.