डोंबिवली – कामगारांचे मृत्यू, सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीस कारणीभूत असल्याचा ठपका ठेवत मानपाडा पोलिसांनी येथील सोनारपाडा येथील अमुदान केमिकल कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता, मलय प्रदीप मेहता, तसेच कंपनीचे संचालक, व्यवस्थापक आणि देखरेख पर्यवेक्षक अधिकारी यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला.
अमुदान कंपनीत अतिशय ज्वलनशील, घातक रसायनांची उत्पादन प्रक्रिया केली जाते. त्यासाठी ही रसायने सुरक्षित साठवण कक्षात ठेवणे आवश्यक होते. या ज्वलनशील रासायनिक पदार्थांंची प्रक्रिया करताना सुरक्षिततेच्या आवश्यक उपाययोजना करून कामगारांच्या जीविताला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेणे हे मा्लक म्हणून मालक मालती आणि मलय मेहता आणि इतर देखरेख अधिकाऱ्यांचे काम होते. अशा कोणत्याही गोष्टींची काळजी कंपनी व्यवस्थापनाने घेतली नाही त्यामुळे अमुदान कंपनीत निष्काळजीपणामुळे स्फोट झाला. या स्फोटात पाच जण मयत आणि ६५ जण जखमी झाले आहेत, असा ठपका मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र चोपडे यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून कंपनी मालक, व्यवस्थापनावर ठेवला आहे.
मृत कर्मचारी
रिध्दी अमित खानविलकर (३८, राहणार सोनारपाडा, डोंबिवली), रोहिणी चंद्रकांत कदम (२८, राहणार आजदे गाव, डोंबिवली) आणि इतर तीन अनोळखी कामगार.
ज्वलनशील रासायनिक घटक
ॲल्युमिनियम आयसोप्राॅक्साईड, मिथी इथील केटोन पॅरॉक्साईड, ब्युटेल पेरबेन्झोट, डाय मिथिल पायथॉलेट, टरसरी ब्युटेल हायड्रो पॅराऑक्साईड, टरसरी ब्युटीन पियोलेट, कमेन हायड्रो पॅराऑक्साईड, बेन्झाल पॅराऑक्साईड, टरसरी ब्युटेल ऑकेट या रासायनिक पदार्थांचे उत्पादन आणि त्यांची प्रक्रिया अमुदान कंपनीत केली जात होती.
मालमत्तेचे नुकसान
अमुदान कंपनीच्या स्फोटामुळे तीन किलोमीटर परिसरातील इमारती, व्यापारी संकुल, मालमत्ता, निवासी इमारती, विजेचे खांब, या कंपनी लगतच्या तीन ते चार कंपन्यांची अतोनात नुकसान झाले आहे. आपल्या कंपनीत ज्वलनीशल पादर्थांचे उत्पादन घेतले जात आहे. त्याची पूर्ण खबरदारी घेऊन उत्पादन प्रक्रिया, या रसायनांचा काळजीपूर्वक वापर होईल याची जबाबदारी मालक, व्यवस्थापनावर होती. ते ही जबाबदारी पार पडण्यात अपयशी ठरले. त्यामुळे या स्फोटात मानवी जीविताचे नुकसान, त्याच बरोबर सार्वजनिक मालमत्तेचे सर्वाधिक नुकसान झाल्याचा ठपका पोलीस निरीक्षक चोपडे यांनी प्राथमिक तपासणी अहवालात ठेवला आहे. सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा, स्फोटके कायदा, स्फोटके वस्तू हाताळणी कायदा आणि मानवी जीविताचे नुकसान या कायद्याने कंपनी मालकांंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.