डोंबिवली : काल डोंबिवलीतील फेज २ एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, तीन किलो मीटरपर्यंत हादरे बसले. २०० मीटर परिसरातील इमारती आणि वाहनांच्या काचा फुटल्या तर बॉयरलचे लोखंडी तुकडे दिड किलो मीटरपर्यंत उडाले होते. आता या स्फोटातील मृतांचा वाढलेला आकडा समोर आला आहे. एकुण जखमींची आकडेवारी देखील समोर आल्याने स्फोटाची तीव्रता किती तीव्र होती हे समजते.
आतापर्यंत डोंबिवली स्फोटामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमध्ये काही कामगार आणि नागरिकांनाही गंभीर दुखापत झाली आहे. स्फोटात ६४ जण जखमी झाल्याची प्राथमिक नोंद आहे. घटनेनंतर जखमींना तातडीने डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर नेपच्यून हॉस्पिटलमध्ये १५ जणांवर उपचार सुरु आहेत. ४ जणांवर अतिदक्षताविभागात उपचार सुरु आहेत.
या स्फोटानंतर केजीएन केमिकल कंपनी, मेहता पेंट, सप्त वर्ण आणि एका शोरूममध्येही आग लागली होती. अमुदान कंपनीतील स्फोटाप्रकरणी कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. आज स्फोटाच्या दुसऱ्या दिवशीही घटनास्थळी सर्च ऑपरेशन सुरू आहे. एनडीआरएफ आणि टीडीआरएफ जवान ढिगाऱ्याखाली शोध घेत आहेत. घटनास्थळावर विदारक, छिन्न विच्छिन्न स्थिती आहे. स्फोटात संपूर्ण कंपनी उध्वस्त झाली आहे.