पुणे: पुण्यातील तुळशीबागेत गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी एका महिलेची पर्स चोरून नेली. चोरट्यांनी पर्समधील एक लाख २१ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुळशी तालुक्यातील पिरंगूट येथे राहणाऱ्या ४७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला नातेवाईकांसोबत रविवारी तुळशीबागेत खरेदीसाठी आली होती. याठिकाणी फिरत असताना त्यांनी मक्याचे कणीस खरेदी केले. त्याचे पैसे दिल्यानंतर हँड पर्स कापडी पिशवीत ठेवली. या पर्समध्ये मिनी गंठण आणि सोन्याचे कानातले व रोख रक्कम होती.
फिर्यादी तेथून पायी चालत तुळशीबागेतील कावेरी आईसक्रीम सेंटर येथे आल्या.
आईस्क्रीम घेण्यासाठी पैसे देण्याकरता त्यांनी पिशवीमधून पर्स काढण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी त्यांना पिशवीत पर्स दिसली नाही. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.