पुणे शहरात दिवसा घरफोडी करुन लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेणाऱ्या मुंबईतील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या दोन आरोपींकडून २० लाख १४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य जप्त केले आहेत.
गुन्ह्याचा तपास करुन चतु:श्रृंगी पोलिसांनी नालासोपारा, पालघर येथून मोहमद रईस अब्दुल आहद शेख (वय-३७ रा. तैयबा मस्जिद जवळ, मालवणी, मुंबई), जोगेश्वरी पुर्व येथून मोहमद रिजवान हनीफ शेख (वय-३३ रा. जोगेश्वरी पुर्व, मुंबई) यांना अटक केली आहे.
२३ फेब्रुवारी रोजी सकाळनगर, बाणेर रोड परिसरात दोन ठिकाणी घरफोडी झाली होती. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही तपासले व तांत्रिक विश्लेषण केले. त्यावेळी आरोपी मुंबई परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने मुंबईत जाऊन दोघांना अटक केली. त्यांची पोलीस कस्टडी घेऊन सखोल चौकशी करुन मुंबई येथे जाऊन ३० तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन, गुन्ह्यात वापरलेली कटावणी, पोपट पाना व स्कू ड्रायव्हर असा एकूण २० लाख १४ हजार ३६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अटक करण्यात आलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. मोहमद शेख याच्यावर ३० पेक्षा जास घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तर मोहमद रिजवान शेख याच्यावर सहा पेक्षा जास्त घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त विजय मगर, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक रुपेश चाळके, पोलीस अंमलदार सुधीर माने, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, किशोर दुशिंग, मारुती केंद्रे, इरफान मोमीन, बाबा दांगडे, प्रदीप खरात, श्रीधर शिर्के, विशाल शिर्के, संदिप दुर्गे व बाळासाहेब भांगले यांच्या पथकाने केली.