पुणे : दुचाकी चोरणाऱ्या एका भंगार विक्रेत्याला खडक पोलिसांनी अटक करुन त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीकडून खडक, चतु:श्रृंगी आणि समर्थ पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई माडीवाली कॉलनी जवळ करण्यात आली. मोबीन सुलतान खान (वय-२७ रा. गल्ली नं.३, पीएमसी कॉलनी, दापोडी, पुणे) असे अटक केलेल्या वाहन चोराचे नाव आहे.
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाहन चोरीचे गुन्हे वाढत आहेत. गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास पथक हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार किरण ठवरे व हर्षल दुडम यांना माहिती मिळाली की, दहा ते पंधरा दिवसांपूर्वी बी.पी. लोहीयानगर येथून हिरो होंडा सी.डी. डीलक्स (एमएच १२ एच आर २७०९) दुचाकी चोरणारा सुशील लॉज गल्लीमधील माडीवाली कॉलनी जवळ थांबला आहे.
मिळालेल्या माहिती खात्री करुन तपास पथकाने सापळा रचून मोबीन खान याला चोरीच्या दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने लोहीयानगर येथून चोरल्याची कबुली दिली. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने आणखी दोन दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ५२ हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार,
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक गुन्हे संपतराव राऊत, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे, पोलीस अंमलदार किरण ठवरे, हर्षल दुडम, संदीप तळेकर, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, लखन ढावरे, रफिक नदाफ, प्रशांत बडदे, सागर कुडले, तुळशीराम टेंभुर्णे, महेश जाधव यांच्या पथकाने केली.