प्रवासी महिलेचा विनयभंग करून फरार झालेल्या ओला कॅब चालकाला देहूरोड पोलिसांनी अटक केली. तसेच त्याची कॅब जप्त करण्यात आली आहे. राहुल पांडुरंग म्हस्के (रा.थेरगाव) असे अटक केलेल्या कॅब चालकाचे नाव आहे. याबाबत एका महिलेने १४ मे रोजी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी महिलेला कोरेगाव पार्कला मित्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाकरिता जायचे होते. त्यासाठी त्यांनी आरोपी राहुल याची एम.एच १४ एल.बी ४१३३ या क्रमांकाची कॅब बुक केली. राहुल याने कॅब कोरेगाव पार्कच्या दिशेने नेली नाही. उलट दिशेने देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणली.
फिर्यादी महिलेच्या एकटेपणाचा फायदा घेऊन मोटारीतच विनयभंग केला. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी राहुल हा ओळख लपवून वावरत होता. संपूर्ण पत्ता माहिती नसताना देहूरोड पोलिसांनी आरोपी राहुल याला अटक केली. गुन्ह्यातील कॅब जप्त करण्यात आली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.