पुणे : पुण्यातील सुमारे शंभरहून अधिक खासगी रुग्णालये विनापरवाना सुरू असल्याची बाब समोर आली आहे. या रुग्णालयांच्या परवान्याची मुदत ३१ मार्चअखेर संपली असून, त्यांनी अद्याप नूतनीकरण केलेले नाही.
महापालिकेच्या हद्दीत ८४० खासगी रुग्णालये आहेत. त्यातील ४१० रुग्णालयांच्या परवान्याचे नूतनीकरण मार्चअखेरपर्यंत पूर्ण होणे आवश्यक होते. कारण त्यांच्या परवान्याची मुदत ३१ मार्चला संपुष्टात आली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने २२ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत यासाठी एक खिडकी योजनेसह विशेष मोहीम राबविली. त्यात ४१० पैकी केवळ २६८ रुग्णालयांनी परवान्याचे नूतनीकरण केले. त्यानंतर आतापर्यंत सुमारे ४० रुग्णालयांनी परवान्याचे नूतनीकरण केले आहे. यामुळे आजच्या घडीला नूतनीकरण झालेल्या रुग्णालयांची संख्या ३१० वर पोहोचली असून, १०० रुग्णालयांच्या परवान्याचे नूतनीकरण झालेले नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेकडून परवान्याचे नूतनीकरण न करणाऱ्या रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई केली जाते. महापालिकेला ही रुग्णालये बंद करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे वैध परवाना नसताना सेवा देणाऱ्या या रुग्णालयांना दरमहा केवळ १०० रुपये दंड केला जातो. या दंडाची सर्वाधिक रक्कम पाच हजार रुपये आहे. त्यामुळे दंडात्मक कारवाईला ही रुग्णालये जुमानत नसल्याचे चित्र आहे. याचबरोबर महापालिकेचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या कामात गुंतले असल्याने परवाना नूतनीकरणावरही परिणाम होत आहे.
शहरातील खासगी रुग्णालये
एकूण रुग्णालये – ८४०
यंदा परवान्याची मुदत संपणारी रुग्णालये – ४१०
परवाना नूतनीकरण केलेली रुग्णालये – ३१०
परवाना नूतनीकरण न झालेली रुग्णालये – १००
परवाना नूतनीकरण न केलेल्या रुग्णालयांना नोटीस बजावण्यात येत आहे. याबाबत क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णालयांच्या परवान्याची तपासणी करण्यासाठी लवकरच मोहीम हाती घेतली जाणार आहे.
– डॉ. भगवान पवार, आरोग्यप्रमुख, महापालिका
रुग्णालयाच्या परवाना नूतनीकरणासाठी अग्निशामक दल आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची प्रमाणपत्रे आवश्यक असतात. ही दोन्ही प्रमाणपत्रे मिळविण्याची प्रक्रिया वेळखाऊ आहे. यामुळे अनेक रुग्णालयांना परवाना नूतनीकरणासाठी विलंब होत आहे.
– डॉ. संजय पाटील, अध्यक्ष, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया (पुणे शाखा)