धुळवड साजरी करताना बेदरकारपणे दुचाकी चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांना पोलिसांनी पकडले. वाहन परवाना नसताना दुचाकी चालविल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांकडून पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळवडीला होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सिंहगड रस्त्यावरील तुकाईनगर भागात पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांच्या आदेशानुसार नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी दोन मुले भरधाव वेगाने दुचाकीवरुन तेथून निघाली होती.
पोलिसांनी नाकाबंदीत त्यांना अडवले. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडे वाहन परवान्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यांच्याकडे परवाना नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी दुचाकी जप्त केली, तसेच त्यांचे पालक आणि दुचाकी मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या मुलांना वयाच्या २५ वर्षांपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना मंजूर करण्यात येऊ नये. संबंधित दुचाकींच नोंदणी एक वर्षांसाठी रद्द करण्यात यावी, असे पत्र पोलिसांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहे. पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याचा परवाना नसताना वाहन चालविण्यासाठी देऊ नये. वाहन परवाना नसल्याचे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करुन वाहने जप्त करण्यात येतील, असा इशारा परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिला आहे.