- पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरठच्या जाहीर सभेत म्हणाले की, भ्रष्टाचाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. मोदींनी हा सर्वात मोठा जोक केला आहे. ते दररोज असा एक विनोद करत आहेत. त्यांचे विनोद ऐकले की वाटते, देशात जॉनी लीवरनंतर कोणी मोठा विनोदी कलाकार असेल तर ते मोदी आहेत. हा गुजरातचा लीवर आहे, जो आमचे मनोरंजन करतोय, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत म्हणाले, मोदी जेव्हा म्हणाले आम्ही भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, तेव्हा त्यांच्या आजूबाजूला १० भ्रष्टाचारी बसले होते. त्यांच्या पक्षात दररोज सरासरी ५ भ्रष्टाचारी नते प्रवेश करत आहेत. हे कुख्यात भ्रष्टाचारी आहेत. तुम्ही त्यांचे काय करणार? ते तुमच्या शेजारी बसतील, तुमच्यासोबत देशभर फिरतील, तुमच्या सरकारमध्ये सहभागी होतील. तुम्ही त्यांच्या गुन्ह्यांच्या फाईल्स बंद कराल आणि आम्हाला अक्कल शिकवाल. खरंतर, भाजपा सर्वात मोठी भ्रष्टाचारी आहे.
संजय राऊत म्हणाले, नरेंद्र मोदी अद्याप निवडणूक रोख्यांच्या घोटाळ्याबाबत बोलले नाहीत. ते नेमका कोणता भ्रष्टाचार संपवणार आहेत? त्याबद्दल बोलले नाहीत. मी मोदींना आणि त्यांच्या पक्षाला आव्हान देतो की, हिंमत असेल तर निवडणूक रोख्यांच्या प्रकरणावर भाष्य करावे. निवडणूक रोख्यांचा घोटाळा हा भाजपाने केलेला भ्रष्टाचार आहे की नाही ते सांगावे. भाजपाने जगाला मुर्ख बनवण्याची कामे बंद करावी.