पुणे : मुस्लिम समाज हा या देशावरील भार आहे, त्यांचे प्रश्न न संपणारे व मानसिकता बायोलॉजिकल फॅक्टर आहे, असे धक्कादायक आधि धार्मिक द्वेष वाढवणारे वक्तव्य भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर प्रचारसभेत केले होते. मोदींच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. आता पुण्यातील सत्यशोधक मंडळाने यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्धीला दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील लोकसभा निवडणूक प्रचारसभेत मुस्लिम समाजाबाबत केलेले विधान दुर्दैवी व खेदजनक आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचा आशय या देशाची एकता धोक्यात आणणारा आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, पूर्वग्रहीत धारणा ठेवून मुस्लिम समाजाला दूषणे देणे, ही हिंदुत्ववादी संघटनांची जुनी कार्यशैली आहे. हिंदुत्ववादी संघटना, भाजप हिंदु-तुष्टीकरण व हिंदु – मुस्लिम ध्रुवीकरणाचे तंत्र वापरत असतातच, मात्र पंतप्रधान मोदीही आता तेच तंत्र वापरू लागले आहेत, हे अयोग्य व एकात्म भारतीय समाज निर्माण करण्यात अडथळा आणणारे आहे.
मुस्लिम जमातवाद संपला आहे, असे नाही. मात्र, या समाजाचे अनेक प्रश्न शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणातून आलेले आहेत, हे वास्तव स्वीकारून त्यावर उपाययोजना करण्याऐवजी या प्रश्नांचे राजकीय भांडवल करण्यात सरकार शक्ती खर्च करत आहे.
लोकसंख्या नियंत्रणाबाबत मुस्लिम समाजात समाधानकारक प्रगती होत आहे.
मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून हिंदुत्ववादी संघटना वारंवार त्याचा उपयोग समाजातील मुस्लिम द्वेष वाढवण्यासाठी करतात. एखाद्या समाजाला असे सातत्याने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून ठेवणे देशाच्या एकात्मतेला धक्का देणारे ठरेल, याचे भान पंतप्रधानांनी ठेवावे, असे डॉ. तांबोळी यांनी दिलेल्या निवेदन म्हटले आहे.