पुणे : अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता. या पराभवाचे खापर तेव्हाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोदी लाटेवर फोडले होते. अजित पवारांसाठी ही लढाई अत्यंत महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची होती. मात्र त्यात बारणे यांनी पार्थ पवार यांचा मोठा मताधिक्याने पराभव केला. तेच विद्यमान खासदार श्रीरंग बारणे मावळ लोकसभा महायुतीचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असल्याने बारणे यांच्या प्रचाराला अजित पवार येणार का? अशी चर्चा रंगली आहे. नुकत्याच झालेल्या नियोजन बैठकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवारांनी मावळमध्ये एक सभा घ्यावी अस आवाहन केल आहे. पार्थ पवार यांचा पराभव करणारे बारणे यांच्या प्रचाराला अजित पवार येणार का हा प्रश्न विचारला जातो आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात लढत आहे. सलग दोन टर्म खासदार राहिलेले श्रीरंग बारणे हे हॅट्रिक करण्यासाठी उत्सुक असून तशी तयारी त्यांनी दर्शवली आहे. तर दुसरीकडे पहिल्यांदाच लोकसभेची संधी मिळालेले संजोग वाघेरे यांनी प्रचाराची पायमूळ गेल्या काही महिन्यांपासून रोवण्यास सुरू केली आहेत. पुन्हा मावळचा गड उद्धव ठाकरे यांना मिळवून देण्यासाठी वाघेरे सज्ज झाले आहेत. दोन्ही उमेदवार स्वतःचा प्रचार करण्यासाठी स्टार प्रचारकांना त्याचबरोबर महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना आणण्यासाठी प्रयत्नशील असतील. याच दरम्यान श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळत अजित पवार येणार का? अशी चर्चा सुरू आहे. अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा श्रीरंग बारणे यांनी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेत पराभव केला होता. हे अजित पवार अद्यापही विसरले नसतील. अजित पवारांच्या प्रतिष्ठेची लढाई म्हणून अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष मावळ लोकसभेवर होतं. बारणे यांनी ही लढाई जिंकत पार्थ पवार यांचा पराभव केला होता.