पिंपरी : प्रेम प्रकरणातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणाच्या अंगावर कार घालून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. या घटनेत निलेश शिंदे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तर सुशील भास्कर काळे याला पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि.२७) मध्यरात्री एकच्या सुमारास टेल्को रोड यशवंत नगर येथे घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुशील काळे आणि जखमी निलेश शिंदे या दोघांचं एका तरुणीवर प्रेम आहे. मात्र, प्रेयसी ही आरोपी काळे याच्यावर प्रेम करते तर निलेश हा त्या तरुणीचा आधीचा प्रियकर आहे. निलेश तिला त्रास देत असल्याचे तरुणीचे म्हणणे आहे. मध्यरात्री निलेश हा एक्स गर्लफ्रेंडला दुचाकी घेऊन भेटण्यासाठी आला होता. याची माहिती तरुणीने सुशील याला दिली. टेल्को रोडवर निलेश आणि सुशील याची प्रेयसी बोलत थांबले होते, तेव्हा सुशील याने भरधाव वेगातील चारचाकी गाडी निलेशच्या अंगावर घातली. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केले.
पिंपरी पोलिसांनी आरोपी सुशील काळे याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. तर त्या तरुणीची पिंपरी पोलीस चौकशी करत आहेत. हा सर्व प्रकार प्रेमाच्या त्रिकोणातून झाल्याचे समोर आले आहे.