अल्पवयीन मुलीने देहविक्री करण्यास नकार दिल्याने तिच्या मानेवर चाकूने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार रविवारी (दि.२६) सायंकाळी सहा ते सोमवार (दि.२७) दुपारी पावणे दोनच्या दरम्यान मावळ तालुक्यातील गोडुंब्रे येथील पवना नदीच्या लहान पुलावर घडला आहे. याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत १६ वर्षाच्या पिडीत मुलीने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पवनकुमार आयोध्या प्रसाद (वय-२३ मुळ रा. रामपुर बेला, ता. पट्टी जी. प्रतापगढ, उत्तर प्रदेश), अंजू गोबरी यादव (वय-३९), दिपक गोबरी यादव (वय-२१ दोघे मुळ मुळ रा. फतेहपुर भटौली, जि. देवरिया, उत्तर प्रदेश) यांच्यावर आयपीसी ३०७. ३६६(अ), ३६८, १०७, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी दिपक यादव यांच्यात प्रेमसंबंध आहेत. आरोपी अंजू आणि पवनकुमार यांनी फिर्यादी मुलाला देहविक्री करण्यास प्रवृत्त केले. मात्र, तिने देहविक्री करण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपींनी मुलीला जीवे मारण्याच्या उद्देशाने तिला मुळगावी सोडवण्याचे आमिष दाखवून लोणावळा येथे घेऊन गेले. त्यानंतर पुन्हा सोमाटणे फाटा येथे अंजू यादव हिच्या वडिलांच्या घरी नेले.
त्यानंतर पवनकुमार याने त्याच्या दुचाकीवरुन गोडुंब्रे येथील पवना नदीच्या लहान पुलावर घेऊन गेला. त्याठिकाणी आरोपी अंजू हिने अंधारात मुलीच्या मानेवर चाकूने वार केला. तर पवनकुमार याने फिर्यादी यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पिडीत मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.