पिंपरी : कौटुंबिक कारणावरुन मोठ्या भावाने लहान भावाचा धारदार हत्याराने वार करुन खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करुन आत्महत्या असल्याचे भासवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. हुजूर महंमुद सैय्यद (वय-३२) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हुजूर याची पत्नी व त्याच्या मोठ्या भावाला आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि.२८) रात्री पावणे बाराच्या सुमारास चऱ्होली खुर्द येथे घडली आहे.
मयत हुजुर याची पत्नी मदिना हुजुर सय्यद (वय-२८ रा. थोरवे वस्ती चऱ्होली खु., मुळ रा. मु.पो. मासाला खु., ता. तुळजापूर, जि. धाराशिव), मोठा भाऊ फिरोज महंमुद सैय्यद (वय-३८ रा. मु.पो. मासाला खु., ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक ए.पी. लोहार यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक राहुल साळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक ए.पी. लोहार हे रात्रपाळी कर्तव्य करत असताना त्यांना माहिती मिळाली की, चऱ्होली खु. येथील थोरवे वस्तीमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. त्यानुसार फिर्यादी व त्यांचे सहकारी घटनास्थळी गेले. त्यावेळी मयत हुजूर सय्यद याच्या पत्नीने सांगितले की, त्यांच्या पतीने स्वत: धडक घेऊन आत्महत्या केली आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता, मृतदेहावर असलेल्या जखमा, घटनास्थळावीरील परिस्थिती, मयत व्यक्तीची स्थिती व मुलांनी सांगितलेल्या माहितीवरुन हुजूर सैय्यद याने आत्महत्या केली नसल्याचे निष्पन्न झाले. हुजूर सैय्यद यांच्यावर धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केल्याचे दिसून आले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी मदिना हिने घटनास्थळावरील रक्त पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मुलीचा जबाब घेऊन हुजुर सैय्यद याची पत्नी मदिना सैय्यद व मोठा भाऊ फिरोज सैय्यद यांना अटक केली आहे.
आरोपींकडे चौकशी सुरु असून प्राथमिक तपासात कौटुंबिक कारणावरुन आरोपींनी हुजूर सैय्यद याचा धारदार हत्याराने वार करुन खून केल्याचे समोर आले आहे. खून केल्यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याचा केला. तसेच हत्यारांची विल्हेवाट लावली. आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरु असल्याचे तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राहुल साळी यांनी सांगितले.