पिंपरी चिंचवड शहरात सोसायटीच्या वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस पडला. आज सायंकाळी साडेचार वाजता पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांचा खोळंबा झाला.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली. त्यानुसार शुक्रवारी (दि. १०) दुपारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. पुणे शहरात देखील दुपारी पावसाला सुरुवात झाली.
पिंपरी चिंचवड शहरात सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. तत्पूर्वी दुपारपासून ढग दाटून आले होते. तसेच सोसाट्याचा वारा सुटला होता. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांच्या कामाचा खोळंबा झाला.
पावसाचा प्रचारावर परिणाम
लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवारांच्या हातात प्रचारासाठी अवघे दोन दिवस राहिल्याने कॉर्नर सभा, रॅली, मोठ्या सभा आणि भेटीगाठी असा जोरदार कार्यक्रम सुरू आहे. त्यातच शुक्रवारी दुपारी अचानक पावसाने हजेरी लावल्याने राजकीय पक्षांच्या प्रचारावर परिणाम झाला. पडत्या पावसात देखील काहींनी प्रचार केला.