चिखली: खाद्य पुरवठा करण्याचा करार रद्द केल्याच्या रागातून खाद्य पदार्थ पुरविणाऱ्या कंपनीच्या मालकाने कामगारांच्या मदतीने कटकारस्थान करून समोस्यात निरोध, दगड अन् गुटखा टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कंपनी मालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करुन एका कामगाराला अटक केली आहे. हा प्रकार स्पाईन रोड चिखली येथील कंपनीच्या कॅन्टीनमध्ये २७ मार्च रोजी सकाळी साडेसात ते पावणे नऊच्या दरम्यान घडला आहे.
याबाबत किर्तीकुमार शंकरराव देसाई (वय-३६ रा. पाटीलनगर, बालेवाडी, पुणे) यांनी रविवारी (दि.७) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एसआरएस एंटरपायझेसचे मालक रहीम शेख, अझर शेख, मझर शेख (रा. मोरवाडी, पिंपरी) कामगार फिरोज शेख उर्फ मंटु, विकी शेख यांच्यावर भा.दं.वि. कलम ३२८, १२०(ब) ३४ नुसार गुन्हा दाखल करुन फिरोज शेख उर्फ मंटु याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हे औंध येथील कॅटॅलीस्ट सर्व्हिस सोल्युशन्स पार्टनर्स प्रा. लि. कंपनीत सहायक महाव्यवस्थापक म्हणून नोकरी करतात. त्यांच्या कंपनीला चिखली येथील एका मोठ्या कंपनीत खाद्य पदार्थ पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे. फिर्य़ादी यांच्या कंपनीने आरोपींच्या मोरवाडी येथील एसआरएस एंटरप्रायझेस या कंपनी सोबत करार करुन चिखली येथील कंपनीला समोसा पुरवण्याचे कंत्राट दिले होते.
आरोपींकडून पुरवण्यात येत असलेल्या समोस्यात प्रथमोपचार पट्टी सापडली. त्यामुळे फिर्यादी यांच्या कंपनीने आरोपींसोबत असलेला करार रद्द केला. त्यानंर फिर्यादी यांच्या कंपनीने पुण्यातील मनोहर एंटरप्रायझेस या कंपनी सोबत करार केला. याचा राग आल्याने एसआरएस एंटरप्रायझेस चे मालक रहीम शेख, अझर शेख व मझर शेख यांनी कट रचला.
आरोपींनी त्यांच्याकडील कामगार फिरोज व विकी यांना समोसा पुरवणाऱ्या मनोहर एंटरप्रायझेस कंपनीत रोजंदारीवर कामाला पाठवले. फिर्यादी यांच्या कंपनीला मिळालेले कंत्राट रद्द होण्यासाठी एसआरएस एंटरप्रायझेसच्या मालकांच्या सांगण्यावरुन फिरोज व विकी यांनी समोस्यात निरोध टाकून किळसवाणा प्रकार केला. तसेच दगड व गुटखा टाकला. हा प्रकार समजाताच फिर्यादी यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन एका कामगाराला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.