बेशिस्त वाहनचालक तसेच काळ्या काचा असलेल्या वाहनांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी शनिवारी (दि.३०) कारवाई केली. वाकड येथील फिनिक्स मॉल परिसरात व थेरगाव येथील पदमजी पेपर मिल परिसरात ही कारवाई केली. वाहतूक पोलिसांनी एकाच दिवसात ४०६ कार चालकांवर कारवाई करून ४ लाख ३७ हजारांचा दंड आकारला. यामध्ये शहरात गोल्डमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाहन चालकाच्या वाहनावर कारवाई केली.
वाकड येथील फिनिक्स मॉल परिसरात दिवसभरात ३०५ वाहनांवर कारवाई करुन दोन लाख पाचशे रुपयांचा दंड आकारला. चारचाकी वाहनांच्या काळ्या काचांवर कारवाई करण्यात आली. पहिल्यांदा कारवाई झाल्यास पाचशे रुपये तर त्यानंतर कारवाई झाल्यास दीड हजार रुपये दंड आकारण्यात येतो. यानुसार पोलिसांनी कारवाई केली. पदमजी मिल जवळ करण्यात आलेल्या कारवाईत ४७ वाहनांवर कारवाई करुन ५० हजार रुपयांचा दंड आकारला.
गोल्ड गाडीवरील काळी फिल्म काढली
‘गोल्ड गाईज’ म्हणून शहरात महागडी अलिशान चारचाकी वाहन घेऊन फिरणाऱ्या वाहन चालकावर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. या वाहन चालकाने त्याच्या चारचाकी वाहनाला सोन्याची पॉलिश केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच गोल्डमन म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या या अलिशान गोल्डन चारचाकीत अनेक हायप्रोफाईल तसेच सेलिब्रिटी दिसतात. ही गाडी शहरात ज्या ठिकाणी दिसते त्याठिकाणी बघ्यांची गर्दी होते. गोल्डमनच्या गाडीवर वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईची चर्चा शहरात आहे.