पिंपरी: भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम हे थोर शास्त्रज्ञ तसेच लेखकही होते. भारताच्या संरक्षण सज्जतेसाठी क्षेपणास्त्र विकासाबाबत त्यांनी महत्त्वपुर्ण योगदान दिलेले असून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तसेच प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जयंतीच्या या कार्यक्रमास नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्रशांत शिंपी, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोविंद नरके, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आरेखक हनुमंत टिळेकर तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा पोखरण-२ च्या चाचणीमध्ये महत्वाचा वाटा होता. त्यांच्या लोकप्रियतेमुळे आणि भारताच्या क्षेपणास्त्र विकासामध्ये केलेल्या कामगिरीमुळे त्यांना मिसाईल मॅन आणि पीपल्स प्रेसिडेंट म्हणून उपाधी मिळाली. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून वैमानिक अभियांत्रिकीची पदवी मिळविल्यानंतर ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये सामिल झाले. भारताच्या आंतराळ कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. राजकीय जीवनातील आणि वैज्ञानिक क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांच्या व्यापक कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. तसेच १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणूनही साजरा केला जातो. त्यांची ” विंग्स ऑफ फायर, महानतेच्या दिशेने, टर्निंग पॉइंट्स ” इत्यादी लेखन साहित्य प्रसिद्ध आहेत.