आळंदी येथील मरकळ मधील फरसाण दुकानातून खरेदी केलेल्या सामानाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून व्यावसायिकाला दगडाने मारहाण केली. तसेच ‘मी मरकळचा भाई’ असे असे म्हणून दुकानातून जबरदस्तीने सामान घेऊन जाणाऱ्या भाईच्या आळंदी पोलिसांनी मुसक्या आवळ्या आहेत. हा प्रकार रविवारी (दि.२) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास मरकळ येथील लक्ष्मी मंगल्म फरसाण दुकानात घडला.
गणेश कुंडलिक लोखंडे असे अटक करण्यात आलेल्या सयंघोषीत भाई चे नाव आहे. तर त्याच्या इतर तीन साथीदारांवर भा.दं.वि. कलम ३८५, ३२४, ३४ सह क्रिमिनल लॉ अमेंन्डमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत देवीप्रसाद जोखोराम गुप्ता (वय-२७ रा. कमळजाई वस्ती, मरकळ ता. खेड) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचे मरकळ येथे फरसाण दुकान आहे. आरोपी फिर्यादी यांच्या दुकानातून सहाशे रुपयांचे सामान घेऊन जात होते. त्यावेळी फिर्यादी यांनी सामानाचे पैसे मागितले. याचा राग आल्याने आरोपीने मी मरकळचा भाई आहे असे म्हणून फिर्य़ादी यांना हाताने मारहाण केली. तर इतर आरोपींनी दगडाने मारहाण करुन जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.