सांगवी – चिंचवड शहरातील सांगवी परिसरात दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी तरुणावर गोळीबार करुन खून केल्याची घटना बुधवारी (दि.२९) रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली. नवी सांगवीतील माहेश्वरी चौकाजवळ इंद्रप्रस्थ गृहनिर्माण सोसायटीसमोर मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. मात्र नेमके कारण समजू शकले नाही.
दीपक दत्तात्रय कदम (वय-३० रा. जयमालानगर, जुनी सांगवी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दीपक याच्यावर गोळीबार करुन मारेकरी पळून गेले. दरम्यान, २०१४ मध्ये संतोष काची यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दीपकसह त्याच्या इतर सात ते आठ जणांवर दाखल आहे. गोळीबारानंतर जखमी अवस्थेत दीपक रस्त्यात पडून होता. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी परिसरातील शंकराच्या पुतळ्यापासून काही अंतरावर अज्ञात हल्लेखोरांनी समोरुन दीपक याच्या तोंडावर गोळ्या झाडल्या. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. गोळीबार करणारे व्यक्ती कोण होते, हे समजू शकलेलं नाही. या घटनेनंतर सांगवीसह पिंपळे गुरव भागात खळबळ माजली आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.