पुणे : कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालक व व्यवस्थापक यांचा विश्वास संपादन करुन बिलांच्या रक्कमेत वाढ करुन ९७ लाख ४८ हजार ५०१ रुपयांचा अपहार करुन कंपनीची फसवणूक केली. हा प्रकार ५ एप्रिल २०२१ ते २१ जानेवारी २०२४ या कालावधीत एस.बी. रोड वरील जे.डब्ल्यु. मॅरिट हॉटेलजवळील निखिल ग्रुप येथे घडला आहे. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अमोल राम माने (वय-३८ रा. पासलकर बिल्डींग, आनंद विहार, हिंगणे, पुणे) यांनी मंगळवारी (दि.३० एप्रिल) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामेश्वर देविदास गिराम (वय-३५ रा. सदाशिव कॉम्प्लेक्स, सदाशिव दांगट नगर, वडगाव बुद्रुक, पुणे), त्याची पत्नी करिष्मा रामेश्वर गिराम (वय-३० रा. हतवान, केंधली, जालना), मंदाकिनी शंकरराव मायकर (वय-३२ रा. पेरणे फाटा, पेरणे), रुद्र टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स च्या मालकावर भा.दं.वि. कलम ४०६, ४०८, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामेश्वर गिराम हा फिर्यादी यांच्या निखील कंन्स्ट्रक्शन ग्रुपमध्ये कामाला होता. आरोपीने कंपनीच्या संचालक व व्यवस्थापक यांचा संचालक यांचा विश्वास संपादन केला. कंपनीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करुन ठेकेदार यांच्या बिलाच्या रक्कमा वाढवल्या. वाढीव रक्कम ठेकेदार यांच्याकडून स्वत:च्या बँक खात्यावर तसेच पत्नी करिष्मा व इतरांच्या बँक खात्यात घेतली.
आरोपी रामेश्वर याने निखील कंन्स्ट्रक्शन ग्रुप. प्रा.लि. या कंपनीच्या मालकाची एकूण ९७ लाख ४८ हजार ५०१ रुपयांची फसवणूक केली. आरोपीने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पैसे ट्रान्स्फर करुन कंपनीचा विश्वासघात करुन पैशांचा अपहार केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रामेश्वर गिराम याच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चतु:श्रृंगी पोलीस करीत आहेत.