पुणे: भांडण झाल्याची तक्रार देण्यासाठी एका व्यक्तीला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना एका तरुणाने पोलीस कर्मचाऱ्याला पाठिमागून येऊन मारहाण केली. तसेच अंगावर असलेला सरकारी गणवेश फाडून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.१३) रात्री पावणे आठ ते सव्वा आठच्या दरम्यान गोल्फ क्लब ते डॉन बॉस्को स्कुल दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलीस शिपाई विजय बाळासाहेब माने यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अक्षय रविंद्र बडगुजर (वय-२८ रा. गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा) याच्यावर भा.दं.वि. कलम ३५३, ३३२, ३३७ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय माने हे दिवसपाळी जेलरोड मार्शल ड्युटीवर होते. त्यावेळी गोल्फ क्लब येथे दोघांमध्ये वाद सुरु असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार माने त्याठिकाणी गेले असता उमेश तटकरे व अक्षय बडगुजर यांच्यात वाद सुरु होता. माने हे तटकरे यांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गाडीवरुन घेऊन जात होते.
त्यावेळी आरोपीने पाठिमागून पळत येऊन मी गाडी चालवतो असे म्हणून माने यांच्या गाडीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी यांच्या डोक्यात मारहाण करुन अंगावरील सरकारी गणेवेश ओढल्याने फाटला.
यानंतर फिर्यादी व उमेश तटकरे यांनी आरोपी अक्षय याला दुचाकीवर बसवून पोलीस ठाण्यात घेऊन जात होते. डॉन बॉस्को शाळेजवळ आरोपी अक्षय याने माने यांच्या डोक्यात जोरात मारले. त्यामुळे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने तिघेही खाली पडले. त्यानंतर अक्षयने तटकरे व पोलीस शिपाई माने यांना मारहाण करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.