पुणे: रस्त्याच्या मधोमध उभारलेल्या दोघांना रस्ता द्या असे सांगितल्याने दुचाकीवरील दोन भावंडांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच लोखंडी वस्तुने डोक्यात वार करुन जखमी केले. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.१०) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास चंदननगर भागातील खुळेवाडी येथील दुर्गा माता मंदिराजवळ घडला.
याबाबत ओम दत्तात्रय लोखंडे (वय-१९ रा. दुर्गा माता मंदिराजवळ, खुळेवाडी, चंदननगर) याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन भारत माणिक पवार (वय-३३) व राहुल कांतीलाल जाधव (वय-१९ दोघे रा. खुळेवाडी, चंदननगर, पुणे) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३२६, ३२३, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच परिसरात राहतात.
फिर्यादी ओम लोखंडे हा त्याच्या भावासोबत दुचाकीवरुन दुध घेऊन घरी जात होता.
दुर्गा माता मंदिराजवळ आरोपी काही लोकांसोबत रस्त्याच्या मधोमध थांबले होते.
त्यावेळी ओमच्या भावाने आरोपीला रस्ता द्या असे म्हणाला. याचा राग आल्याने आरोपींनी ओम व त्याच्या भावाला अश्लील शिवीगाळ केली. तसेच ओमच्या भावाला कानशिलात लगावली. भांडण सुरु असताना भारत पवार याने त्याच्या हातातील लोखंडी वस्तुने ओमच्या डोक्यात पाठीमागून वार करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास विमानतळ पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले करीत आहेत.