पुणे: मारण्यासाठी मुले पाठवल्याचा गैरसमज झाल्याने चार जणांच्या टोळक्याने एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या अंगावरील सर्व कपडे कडून त्याचा नग्न व्हिडीओ बनवून इंन्स्टाग्रामवर व्हायरल केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार डेक्कन येथील झेड ब्रीज खालील नदिपात्रात बुधवारी (दि.१०) रात्री बारा ते पहाटे साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडला आहे.
याबाबत पीडित मुलाच्या ३७ वर्षीय आईने गुरुवारी (दि.११) डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अन्सु शर्मा (वय-१९ रा. मंडई मागे, पुर्ण पत्ता माहित नाही) याच्यासह इतर तीन जणांवर भा.दं.वी. कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अन्सु आणि फिर्यादी यांचा मुलगा एकमेकांचे मित्र आहेत. फिर्यादी यांच्या मुलाने अन्सू याला मारण्यासाठी मुले पाठवल्याचा गैरसमज आरोपींचा झाला. बुधवारी रात्री बाराच्या सुमारास आरोपी अन्सू त्याच्या इतर तीन साथीदारांसह आला. त्याने फिर्यादी यांच्या मुलाला कमरेच्या बेल्टने व लाकडी बांबूने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांच्या मुलाच्या अंगावरील सर्व कपडे काढून त्याचा नग्न व्हिडीओ बनवून इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. याबाबत पोलिसांकडे तक्रार केली तर समाजाच्या ग्रुपवर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास डेक्कन पोलीस करीत आहेत.