कात्रज : जबरदस्तीने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पाच जणांनी महिलेला अश्लिल शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार पुण्यातील कात्रज परिसरात घडला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.३) दुपारी बाराच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी सह पाच जणांवर बलात्कार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
अभि नितीन खेडेकर, त्याचा मित्र, आई, बहिण व मामा यांच्यावर भा.दं.वि. कलम ३७६, ३४१, ४५२, ३२३, ५०९, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पिडीत महिलेने मंगळवारी (दि.४) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभि खेडेकर याचे वडील नितीन खेडेकर हे फिर्यादी यांच्या ओळखीचे आहे. सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास आरोपी ओम आणि त्याचे मित्र फिर्यादी यांच्या घरासमोर आले.
आरोपी अभि खेडेकर हा महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसला. त्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करुन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर अभि खेडेकर, त्याची आई व बहिण आणि मामा यांनी महिलेच्या घरासमोर येऊन फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तसेच हाताने बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये फिर्यादी यांच्या डोळ्याला, डोक्यात व बरगडीस गंभीर मार लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.