पुणे शहरात ४ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने चार वर्षाच्या मुलीला आडोशाला नेऊन तिच्यासोबत असभ्य वर्तन करताना पिडीत मुलीच्या आईने त्याला रंगेहाथ पकडले. हा प्रकार रविवारी (दि.२६) सायंकाळी सातच्या सुमारास वडगाव बुद्रुक परिसरात घडला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
याबाबत पिडीत मुलीच्या २४ वर्षीय आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन धनलाल छोटेलाल पासवान (वय-२६ रा. वडगाव बुद्रुक, पुणे) याच्यावर आयपीसी ३७६(३), ३७६/२/जे, ३७६/अ/ब, पोक्सो कलम 3, 4(एम), ५, ६, ७, ८, ९(एम), १० नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास आरोपीने फिर्यादी यांच्या चार वर्षाच्या मुलीला परिसरातील एका आडबाजूला नेले. त्याठिकाणी त्याने मुलीसोबत अश्लील वर्तन केले. दरम्यान, पिडीत मुलीच्या आईने हा सर्व प्रकार पाहिला. त्यानंतर मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण लिटे करीत आहेत.
रिक्षाचालकाकडून अश्लील हावभाव
येरवडा : अल्पवयीन मुलीकडे पाहून अश्लील हावभाव केल्याप्रकरणी रिक्षाचालकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.२७) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास येरवडा परिसरात घडला आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार एमएच १२ सीएच ४१८१ क्रमांकाच्या रिक्षाचालकावर भा.दं.वि. कलम ३५४ सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास येरवडा पोलीस करीत आहेत.