पुणे : इमारतीच्या कामावर सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीचा चाकूने भोसकून खून करत त्याला इमारतीवरुन खाली फेकून दिल्याचा प्रकार कोंढवा परिसरातील रहेजा स्टर्लिंग सोसायटीच्या क्लाऊड नाईन जवळ घडला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी २४ तासात दोन आरोपींना अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पंकज कुमार मोती कश्यप (वय- ३५ रा. कृष्णानगर, गल्ली नंबर २, मोहमदवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी राज उर्फ सुरेश मनीराम आर्या (वय-३४ सध्या रा. महंमदवाडी, पुणे मुळ रा. उत्तर प्रदेश), भोलेनाथ राजाराम आर्या (वय-२६ सध्या रहेजा व्हिस्टा लेबर कॅम्प पुणे मुळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. याबाबत पंकज यांची पत्नी मीनाकुमारी पंकज कश्यप (वय-३०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.१६) रात्री आठ ते साडे आठ दरम्यान घडला.
दाखल गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना मयत पंकज याला घटनास्थळी बोलावून घेतल्याचे निष्पन्न झाले. पंकज याला बोलावून घेणाऱ्या संशयीतापैकी राज उर्फ सुरेश आर्या हा खुनाच्या रात्रीच काही मजुरांसमवेत उत्तर प्रदेशात पळून गेल्याचे समजले. त्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी एक पथक उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आले.
मजुरांकडे केलेल्या चौकशी दरम्यान व नातेवाईकांचा शोध घेवून पकंज हा आरोपी राज उर्फ सुरेश आर्या यांच्यासोबत पुर्वी काम करित असताना दोघांनी मिळून मुळगावी उत्तरप्रदेशात एकत्रित जमीन खरेदी केली आहे. ती जमीन मयत पंकज याच्या नावावर असून ती जमीन सुरेश याच्या नावावर करुन देण्यास विरोध करत होता. यावरून त्यांच्यात वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांच्या पथकाने बांधकाम साईटच्या बाहेरील रोडवरील ४२ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता आरोपी याच्या सोबत त्याचा नातेवाईक (दाजी) भोलाराम राजाराम आर्य़ा याचा शोध घेत असताना तो पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लेबर कॅम्पमध्ये थांबल्याचे समजले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता पंकज याचा खून आरोपी सुरेश याच्या सोबत केल्याचे कबुल केले. तसेच सुरेश हा त्याच्या मुळगावी घोरमा परसिया उत्तर प्रदेश येथे पळून गेल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने उत्तर प्रदेशात जाऊन सुरेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिंगोळे, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, निलेश देसाई, शाहिद शेख, लक्ष्मण होळकर, अभिजीत जाधव, संतोष बनसुडे, गणेश चिंचकर, राहुल रासगे, अक्षय शेंडगे, जयदेव भोसल, विकास मरगळे, शशांक खाडे, रोहित पाटील, राहुल थोरात, अभिजीत रत्नपारखी, सुरज शुक्ला, सुजित मदन यांच्या पथकाने केली.